Murarbaji(मुरारबाजीं)
10 February 2023

Murarbaji(मुरारबाजीं)

मुरारबाजीं

१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले. आजही तुम्ही कधी पुरंदरला गेलात तर मुरारबाजींचा पुतळा बघून त्यांच्या शौर्याची गाथा कळते. किल्लेदाराबरोबर किल्लाही पडला. तह व्हायच्या आधी शिवाजीराजांनी मिर्झाराजाला एक पत्र पाठवले होते. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात, "तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."



सर्वत्र सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मुघलांशी तह करायचे ठरवले. पुरंदरचा तह घडला. १६ वर्षात जे कमावले ते सर्व या तहात राजांनी गमावले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. तहानंतर शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्यासाथीने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भिती मिर्झाराजाला होती म्हणून त्याने बादशहाला कळवले की 'कुठल्याही परिस्थितीत शिवाजीला आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवत आहे.' मिर्झाराजाने राजांना आग्रा येथे जाण्यास तयार केले आणि त्याप्रमाणे मार्च १६६६ रोजी राजे आग्रा येथे जाण्यास निघाले. स्वतःच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त खुद्द औरंगजेबाने त्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. 'मनात कुठलीही चिंता किंवा शंका ठेवता मला भेटायला या. आपला येथे सत्कार केला जाईल आणि तुम्हाला पुन्हा दख्खनेत जाण्याची मुभा असेल.' मजल-दरमजल करत शिवाजीराजे १२ मे रोजी तेथे पोचले.